Thursday, March 3, 2011

बुहुहुहू.....

काय झालेय, आताच एक पोस्ट टंकून झालीये आणि पुन्हा आपले रडगाणे सुरूच आहे (बुहुहुहू....)
ह्म्म्म, काय करायचे ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??..
कविता करायची म्हणतंय मन, हे हे हे येड का खुंल, म्हणे कविता करायचीये, कळतं का कशाशी खातात तिला (हो आम्ही खाण्यासाठीच जगणारे प्राणीमात्र आहोत..एकदम कबूल) हे हे हि हि हि हा हा खु खु खा खा खे खे खे
ओके कंट्रोल कंट्रोल बच्चा.. हा तर काय कविता... काय आठवतंय बघूया यावरून...
१) ह्या नावाची ना माझी एक मामे बहिण होती, ((म्हणजे आहे अजूनही तिचे लग्न झाले मागल्या वर्षी (??? मेमोरी प्रोब्लेम), हि बाय मला कायम आठवते ते तिच्या बॉब कट साठी (केसांचा), म्हणजे ना हिचे केस हे एक प्रकरणच होत, सतत पिंजारलेले, त्यावत एक प्लास्टिक चा बेल्ट (बहुदा लाल रंगाचा) शाळेत लावतात तसा, त्यातून सगळ्या केसांचे मिळून त्या बेल्ट भोवती चिमणीचे घरटे झालेले, तोंडावर लहानपणी काळे डाग (बहुदा चिकट) आणि मोठेपण मुरुमाचे डाग पडलेले, सतत चिवचिवणारी पोरगी, भारी कामसू, मोठ्याने बोलणारी (म्हणजे अगदी मोठ्याने घराच्या बाहेर ओसरी पर्यंत तिचा माजघरातला आवाज जायचा) अशी हि माझी बहिण)) हा तर काय झाल होत?? अरे हो , हिचे लग्न झाले मागल्या वर्षी आणि हि आलीये आता नागपूरला राहायला (सासरी), मस्त एन्जोय करतेय आयुष्य, ना नोकरीची वणवण ना पैश्याची चणचण, ना सासूची घनघन (मुठीत ठेवली सासूला पठ्ठीने).. घरात काम करायची, नवऱ्याची सेवा (हो बरोबर वाचताय) करायची, सासूला गोड शब्दात गुंडून ठेवायचे आणि ... आणि काय मज्जा कि ....(मला जमेल का हे असा सगळ??? श्या काय पण विचार करतीये मी...)
२) कविता... कुसुमाग्रज. आताच यांचा वाढदिवस 'मराठी दिवस' म्हणून साजरा झालाय, आता ते मराठीतले मोट्ठे कवी होते, निःसंशय अत्यंत प्रतिभाशाली होते, पण म्हणून त्यांचा वाढदिवस एक दिन म्हणून का साजरा करायचा?? कायहेतू असू शकतो?? कालनिर्णयाच्या त्या पानावर अजून एक नोंद वाढेल, त्यांच्या नावाने जाहीर कार्यक्रम होवून आमच्याच पैशाने काही साहित्यिक काही नेते मिरवून घेतील, काही स्मृतिपर पुस्तके निघतील, काही नवीन कवींना संधी मिळेल, काही शाळांमध्ये खरोखर कुसुमाग्रजांना आदरांजली चे दर्जेदार कायक्रम होतील, बहुतेक त्यातून छोटे-कोवळे-मऊ-हिरवे कवितेचे बीजान्कुरही सापडतील आणि... आणि काय होईल?? (माझी धाव संपली इथेच...बहुतेक मिळाले उत्तर पण तरीही 'दिन' असलाच पाहिजे का???.... याला म्हणतात 'गाढवापुढे वाचली गीता....')
३) मी ना लहानपणी आईवर एक कविता केली होती, एकदम ओरीजनल ना, अन का कुणास ठावूक ती आईला नाही दाखवता आलेली मला, ती वही पण हरवली नंतर. पण तो फील.. आई वर कविता, तिची रोजची कामं, धावपळ, तिचे आमची काळजी घेणे, सुखावणारे क्षण, सारे सारे होते त्याच्यात. श्या... दाखवायला हवी होती तेव्हा आईला कविता ती, काय जरा हसलीच असती ना..!!! काही ना केलेल्या गोष्टींची अशीच चुटपूट लागून राहणारेय आयुष्यभर....
४) आम्ही कॉलेज च्या मासिकासाठी एका वर्षी कविता दिल्या होत्या, कोणी तर मी, माझी सिंधी आणि पंजाबी रूम पार्टनर, आणि वरून सांगतोय कि हि कविता आम्हीच लिहिलीये स्वतः म्हणजे तिघींनी मिळून. काय पण भारी ना ... आता त्या दोघीना मराठीचा गंध नाही आणि म्हणे कविता लिहिली.. (हे हे हे ) खरे म्हणजे आम्ही एका दुसर्या कॉलेजचे मासिक आणून त्यातून ६-७ कवितांचे तुकडे अगदी बेमालून जोडले होते... आणि ती कविता चक्क "उत्तेजनार्थ" चे लेबल लावून मासिकात छापून आणली होती, आता बोला... अहो होता वट आमचा तेव्हा कॉलेज मध्ये..!! आजही ते मासिक मी जपून ठेवलंय. आता त्या मैत्रिणी नाहीत, तो जिव्हाळा नाही, ती मैत्री पण नाही, पण त्या आठवणी मात्र नेहमी साठी आहेत...
५) वर्ग : ५वी अ, वर्गशिक्षिका : भोयर बाई. दिवस : बुधवार. विषय : मराठी. तास : दुसरा. गृहपाठाच्या वहीत लिहिलेला निबंध. अख्या वर्गात उत्तम निबंधासाठी नावाजलेली एक मुलगी वि. वा. शिरवाडकर यांच्यावर लिहिलेला निबंध वाचून दाखवतेय. अत्यंत रसभरीत वाणीने, उत्तम उच्चाराने आणि योग्य माहितीने बाईंचे मन जिंकून घेतेय.... आणि.... आणि ... तिच्या बेंच वरील तिच्या मैत्रिणी कसोशीने आपले हसू दाबून बसल्या आहे...
काय काय विचार आलेत तुमच्या मनात??? मी सांगू लगेच मनात अटकळ बांधली असेल कि ही मुलगी कुणा दुसरीने लिहिलेला निबंध वाचून दाखवतेय, भारी जोक क्र्यक झालाय, बाहेर मैदानावर कुणीतरी धडपडलाय किंवा असेच काही तरी ...हो ना. खरे म्हणजे, ती मुलगी जी वाचत होती ना, तिने चक्क कोरी वही समोर पकडली होती, आणि आपल्याच मनाने बडबडत होती (काय जबरदस्त वाचन असेल नाही) .. आता बोला. हाय का नाय गंमत... आता विचार ती मुलगी कोण होती??? नाही नाही मी नाही काय राव... काहीही काय.
ती होती..............च्च विसरले नाव, पण ना वर्गात सगळ्या शेवटल्या बेंचवर बसायची.. (तिच्याशी मैत्री करायचीच राहिली, पाचवीत असताना शाळा सोडून निघून गेली, पुढे काहीच कधीच कळले नाही तिचे).
६) उन्हाळ्याची दुपार, दाट पिंपळाखाली गार सावलीत विसावलेल्या दोघी, सोबत एक वाटरबॉटल, पांढरा कांदा, मसाला फुटाने, कच्चे धापोडे, गुळ-शेंगदाने, आणि असे बरेच काही सटर -फटर, समोर वाहणारी कोरम्बीची नदी, अतीव शांतता आणि दोघींच्या रंगलेल्या गप्पा... हसणे- खिदळणे, यव नी त्यंव,
मी आणि माझी मैत्रीण शिल्पा, बर्याच उन्हाळी दुपार आम्ही अश्या घालवल्या आहेत.... अगदी कवितेच्या धुंदी सारख्या...
७) अजून काय काय आठवतंय, पण सगळ्या आठवणी बालपणीच्याच आहेत, अगदी ५ वी ते १० वी पर्यंतच्याच... कसला मस्त होता तो काळ, कवितेसारखा, लगेच न कळणारा प्रकार, पण एकदा अर्थ समजायला लागला कि अगदी बांधून ठेवणारा पाश जणू....

नोटीस पिरेड...

नोटीस पिरेड...

च्च... काम करायला नसल्यावर एवढे बोर होत असेल याची मी अजिब्बात कल्पना केलेली नव्हती म्हणजे पाट्या टाकणे, बेंचवर असणे, आउट ऑफ प्रोजेक्ट, टाईमपास करणे हे सगळे प्रकार इतके कंटाळवाणे असू शकतात याचा मला अक्षरशः साक्षात्कार होतोय...
त्याच काय झालाय कि मी हि मस्त मजेची नोकरी सोडलीये आणि सध्या आहे नोटीस पिरेड वर, मग काय सगळे प्रोजेक्ट्स कलीगला handover करणे, सगळ्या फाईल मधले बिन कामाचे कागद फाडणे, पुन्हा नव्याने सगळे कमपाईल करून अप-टू-डेट करणे, सगळे जुने पुराने अहवाल वैगरे चेक करणे, महत्वाचे मेल पर्सनल अकौंटला शिफ्ट करणे, महत्वाच्या गाईडलाईन्स कॉपी करून घेणे, काही स्वतःचे कामाचे नमुने सोबत शिदोरी म्हणून चोरून लांबवणे.... झाले सगळे करून झाले आणि आता माझ्याकडे काहीही काम नाही आहे.... बुहुहुहु (लहान पाणी कौमिक्स वाचण्याचा परिणाम)
आता मी काय करू, म्हणजे चक्क रिकामी बसलीये मी इथे. काहीच काम नाही...!!! गेल्या दोन-अडीच वर्षात असे पहिल्यांदाच घडतंय कि मी बिनकामाची बसले आहे... म्हणजे काय, च्च, काहीच सुचेनासे झालेय नी आता ब्लॉग लिहायला घेतलाय, असे कसे होवू शकते?? विदौट काम आणि मी.. त्यापेक्षा असे वाटते आहे ना कि खोली वर जाऊन बांधाबांध करावी झाले, निदान ते तरी होईल... काय कसं श्या सगळा वैताग आहे...
बघुयात संध्याकाळ पर्यंत कसा तग धरता येतो ते...

Tuesday, March 1, 2011

प्रिय विनील...

मी हा लेख 'आळश्यांचा राजा' च्या ब्लौग वरून घेतला आहे। तुम्ही पण याच्या प्रसारास मदत करा ...

प्रिय विनील,
श्रावण मोडक या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका सुजाण नागरिकाने खालील लेखवजा प्रकटन/ खुले पत्र मिसळपाव डॉट कॉम तसेच अन्य संस्थळांवर प्रकाशित केले आहे. त्यांच्या सौजन्याने हे इथे पुनर्प्रकाशित करीत आहे. वाचकांनी हे आपापल्या ब्लॉगवर (विनाबदल) प्रकाशित करायला मूळ लेखकाची काही हरकत नाही. याचा जमेल तेवढा प्रसार करावा हे आवाहन. आपल्या पाठिंब्याची विनीलसारख्या अधिकारी-कार्यकर्त्यांना गरज आहे.
- आठवणी.
***********************************************************************************************************
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रिय विनील,
परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?
रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.
तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.
तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.
मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.
तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.
हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.
आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.
हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.
एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.
कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.
तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.
विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.
आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.
विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.
आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.
विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?
हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?
पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.
विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.
तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.
तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.
आय सॅल्यूट यू, सर!
सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.
सौजन्य - श्रावण मोडक.

Monday, February 21, 2011

सोमवारची सकाळ...

एकेकाळी..
सोमवारची सकाळ म्हणजे शिवाच्या मंदिरातली घंटी आणि त्या कर्पूरगौर रूपाचे न्हाहुन घेतलेले दर्शन...
सोमवारची सकाळ म्हणजे धोब्या कडून कडक इस्त्री केलेल्या युनिफोर्मचा नाकात भिनलेला वास..
सोमवारची सकाळ म्हणजे आईच्या हातची फोडणीची खिचडी आणि पाठीवर लटकलेले दप्तर..
सोमवारची सकाळ म्हणजे कॉलोनितल्या सगळ्यां मैत्रिणींच्या नावाचा साताला झालेला उध्दार..
सोमवारची सकाळ म्हणजे शाळेतल्या मैत्रिणींचा सायकल स्टाण्ड वरील गोंधळ आणि शाळेला झालेला उशीर..
सोमवारची सकाळ म्हणजे रविवारी खेळण्याच्या नादात विसरलेला गृहपाठ आणि मैत्रिणीची मनधरणी..

आजकाल...
सोमवारची सकाळ येते तीच रविवारचा आळस आणि शनिवारचा कंटाळा घेऊन..
सोमवारची ऑफिस मधली सकाळ म्हणजे कामाचा ढीग, भरून वाहणारा ईनबॉक्स आणि कौफीचे घुटके..
सोमवारची सकाळ म्हणजे कॅन्टीन चा नाश्ता आणि बाहेरचे जेवण..
सोमवारची सकाळ म्हणजे डोळ्यात न मावणारी झोप आणि महत्वाची कॉन्फेरेनस..
सोमवारची सकाळ म्हणजे वैताग वैताग आणि वैताग....

Monday, February 14, 2011

चिडचिड...

आज सकाळी सकाळी भविष्य वाचले, उगीच गुंता-गुंत करू नका, जास्त बोलू नका, तोंड उघडून अपशकून करू नका, तरी झालेच, जे होणार होते ते झालेच शेवटी...
काय???? काही नाही, एका अत्यंत उर्मट (हो उर्मटच, उद्धटाच्या वरची स्टेज आहे न ती) अश्या डॉक्टर कलीग ची वाजली, असल टेन्शन आलंय न,
तिचे नाही, तर तिच्या ऑफिस मधल्या पोकळ वजनाचे, आणि ती आहे पण चुगलखोर, एकदम (...वाईट, छोटा आहे शब्द.. अम्म्मम्म्म, हा), गलिच्छ विचारांची पोरगी आहे...
काय मी पण न, काय करू कसे करू, म्हणजे माझी पण होती चूक, नाही कोण म्हणताय पण दोनदा क्षमा मागितली मी तिची, तरीही, हिची बडबड चालू, आणि तेही फोन करून, काय समोर बोलता येत नाही न तिला, (हिम्मत लागते त्याला) श्या... कैच्या कै

ह्म्म्म, आता ती चार पाच दिवस खुन्नस देणार, माझ्यावर तापून असलेली तिची जुनिअर आता हा मौका अजिबात नाही सोडणार, त्यांच्याच टीम मधला सिनियर (अजिबात स्वताचे मत नाहीये ह्याला) अजून आगीत तेल घालणार, आणि पुढला सगळा आठवडा टेन्शन मध्ये जाणार...
का मीच का दर वेळी, हा शनिवार -रविवार पण धावपळीचाच गेलाय, जरा त्यात सुखाचे काही कण वेचले पण असे वाटतेय, निर्भेळ सुख काही माझ्या वाट्याला येणार नाही,

एकीकडे समस्यांचा डोंगर आहे तर दुसरीकडे आयुष्याची नवी सुरवात आहे.... न धड समस्या सोडवता येत न धड सुखी होता येत, काय हे सुख दुख नेहमी हातात-हात घालूनच आले पाहिजेत का, जरा मागे-पुढे यायला काय जाते यांचे....
जाऊ दे ..... होता है, चलता है, जिंदगी है .......!!!

Saturday, February 5, 2011

सही रे सही

ह्म्म्म, काय दिवस गेलाय आजचा, एकदम मस्त.. कसलं सही वाटतंय न, म्हणजे अगदी कॉलेज मध्ये वाटायचे ना तेच ते फुलपाखरा सारखे दिवस, अगदी तसेच.. . मन अगदी पिसासाराख्न झालंय, तरंगतय , उद्या मारताय, बागडतय , नाचतंय गातंय, काय काय करतंय... खूप खूप खुश आहे मी, कसलं झक्कास वळण घेतलं आयुष्याने, म्हणजे अगदीच अकल्पित नाहीये पण मस्त वाटतंय ना कि .....
आईशप्पत, खूप खूप सही वाटतंय, मेलं लिहायलाही जमत नाही सगळे मनातले... आणि हे सगळे ब्लोग वर तरी कसं टाकायचे ??? "कठीण कठीण कठीण किती..." बस इतकाच गुनगुनायला येतंय आता...

Saturday, January 22, 2011

!!!!!!

काय करू सुचतच नाहीये टायटल मग टाकले असेच, पण असे टायटल असेल की एक बरे असते काहीही लिहिता येत, उगीच एक लिहितांना येणारा दूसरा विचार दाबुन पहिला पुढे दामटावा लागत नाही, कसे???
हा तर मी ना संक्रांति वर एक पोस्ट लिहिणार होते, म्हणजे लिहिली पण होती, मग कंटाळा आला तर ते राहिलाच बाजूला... असो
हे असो वैगरे लिहिले की काय ग्रेट वाटते नाही, एकदम प्रौढ़ भाषा... काल मी 'स्लीपलेस इन सीटल' हा मूवी वाचत होते, खरच मी हा पिक्चर विकिपीडिया वर वाचत होते, मग हा जुन्या काळातला इंग्रजी पिक्चर पूर्ण स्टोरी सह तिथे वाचला, आवडला म्हणजे कथा साधीच आहे पण त्याची बांधणी आवडली, मग जाणवले की अरेच्चा आपला ''कुछ कुछ होता है' पण जरा त्याच्यासारखाच आहे की, म्हणजे पोरांनी आपल्या आई-बापाचे लफड़े करून द्यायचा प्रकार हो अजुन काय... पण बॉस आपल्याला त्याचे काय म्हणजे मला, मी तर ही सगळी माहिती फक्त त्यातील गाण्यासाठी, गाणी पण आवडली मला, ते स्टारडस्ट, वेन आय फोल इन लव, द वे ऑफ लाईफ... मस्त गाणी आहेत...
बघायला पण पाहिजे पिक्चर, स्टोरी मी इथे लिहिणार नाही, विकिमाता आहेच त्यासाठी... तोवर जरा अजुन गाणी शोधायला पाहिजेत....