थंडीची सकाळ... साखरझोपेची वेळ... रजईमधे गुरगुटून येणारी उबदार झोप... आणि तेवढ्यात आईची हाक " अग उठ शाळेला उशीर होईल ना" आणि आपल्याला अचानक एकदम गाढ झोप लागते... मग रजाईची लढाई... शेवटी आईचा विजय आणि आपण दोन धपाटे खावुन उठणार... उशीर होतोय म्हणून आईचा सुरु असणारा ओरडा... अश्यावेळी मग आईला dialog ऐकवले जातात, "तू माझी आई की त्या शाळेची? मला नाही जायचे एवढ्या थंडीत शाळेत..." बाबा म्हणतात, "बरय नको जाउस"... आणि सरते शेवटी आईचा मार... अगदी कान धरून... मग रडत रडत शाळेत जातांना सुरु... "आई माझी वाईटच आहे... नाही जाणार मी घरी परत... किती मारते मला..." शाळेत पण सगळ्या मैत्रिनीसमोर कथा सांगितली जाते... प्रत्येकीचे सल्ले मारकुट्या आयाना कसे सरळ करायचे... शाळा सुटली की पाय आपोआप घराकडे वळतात आणि मनात युद्धाचे आराखडे सुरु असतात... त्याच धुंदीत चालताना अचानक ठेच लागते आणि तोंडातून निघतं "आई ग "... डोळ्यातून टचकन पाणी येतं... पाय घराकडे धावू लागतात... त्यांच्या आधी मन तिथे पोहोचलं असत... आईचा शोध घेत... जिचा सकाळ पासून खुप राग आलेला होता... जी अगदी वाईट होती... घरी पोहोचल्यावर " आई आई " हाका सुरु... "अग काय झाले? पायाला काय लागले? रक्त येतेय... अरे बापरे" आपल्याला पुढचे काहीच दिसत नसतं... डोळे वाहत असतात... आईला घट्ट मीठी मारलेली असते... तिचे अखंड प्रश्न आपल्याला ऐकुच येतं नाहीत.......
रात्रि आईच्या कुशीत झोपताना आई पुन्हा म्हणते..." उद्या सकाळी लवकर उठ... आजसारखा उशीर करू नकोस..." आणि आपण खुदकन हसतो... सकाळी सांगितलेले मैत्रिणींचे सल्ले आणि आपले प्लान आठवत असतात ना...
No comments:
Post a Comment